तोयबाच्या म्होरक्‍यांशी संपर्कात असलेल्या तरूणाला कर्नाटकमधून अटक

नवी दिल्ली – पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्‍यांशी संपर्कात असणाऱ्या तरूणाला कर्नाटकमध्ये अटक करण्यात आली. ती महत्वपूर्ण कारवाई राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केली.

पाकिस्तानातून सक्रिय असणाऱ्या तोयबाच्या म्होरक्‍यांचे भारतविरोधी मनसुबे उघड करणारे एक प्रकरण काही महिन्यांपूर्वी समोर आले. सोशल मीडियाचा वापर करून तोयबाचे म्होरके त्यांच्या दहशतवादी संघटनेत तरूणांना भरती करण्यासाठी प्रयत्नशील होते.

तरूणांना दहशतवादाच्या मार्गावर नेऊन भारतात दहशतवादी कारवाया घडवण्याचा कट त्यामागे होता. त्यावरून पश्‍चिम बंगालमध्ये मार्चमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला. त्या प्रकरणाचे लागेबांधे कर्नाटकपर्यंत पोहचल्याचे तपासातून निष्पन्न झाले.

त्यानंतर तोयबाच्या म्होरक्‍यांनी सोशल मीडियावर बनवलेल्या विविध ग्रुपचा घटक असणारा सय्यद एम.इद्रिस (वय 28) एनआयएच्या रडारवर आला. अखेर त्याला मंगळवारी अटक करण्यात आली. त्याला आता कोलकतामधील विशेष एनआयए न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे समजते. त्याच्या चौकशीतून तोयबाच्या कट-कारस्थानांवर प्रकाश पडण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.