…आणि जखमी असतानाही पोलीस निरीक्षक मॅरेथॉनमध्ये धावले

कात्रज – उजव्या पायाला दुखापत झालेली असताना पिटीबीच्या साहाय्याने टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत 42 कि.मी. अंतर 5 तास 24 मिनिटांत पूर्ण करून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे यांनी खेळाडूंपुढे प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक गुन्हे या पदावर कार्यरत असणारे विष्णू ताम्हाणे यांनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचे निश्‍चित केले, त्यानुसार सराव सुरू केला सुरुवातीला पाच, अकरा व एकवीस असा अनुक्रमे विविध मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होत यश मिळविले. सरावादरम्यान त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली.तपासणीअंती स्पर्धेत आपण सहभागी होऊ शकत नाही, असे भारती विद्यापीठ हॉस्पिटल येथे डॉ. खाडिलकर यांनी सांगितले. तसेच, फिट टू स्पोर्टस्‌चे डॉ. अजित मापारी यांनीही ताम्हाणे यांना मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ नये, असा सल्ला दिला.

धावण्यासाठी काय उपाययोजना करावी, असा प्रश्‍न ताम्हाणे यांनी डॉक्‍टरांना केला.
हे ऐकून डॉक्‍टरांनी आवाक होत ताम्हाणे यांना पिटीबी बनविण्यास सांगितले. यातून धावताना इजा झालेल्या पायावर ताण येणार नाही, असे सुचवले.

पिटीबी लावून धावण्याकरिता सराव करीत ताम्हाणे यांनी 42 कि.मी.ची टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत धावण्याची तयारी पूर्ण करीत यामध्ये यशही मिळवले. या स्पर्धेसाठी ओंकार भागवत, अभिजित अहिरे, कुणाल बडगुजर यांचे सहकार्य लाभले. पोलीस प्रशासनासह सर्व स्तरातून ताम्हाणे यांचे कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.