वानवडी – सकाळी दहाची वेळ… वानवडीतील पालीकेच्या कै. विठ्ठलराव शिवरकर उद्यानात वानवडी रामटेकडीचे सहाय्यक आयुक्त शाम तारू यांनी भेट देत नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवरकर उद्यानात मॉर्निंग वॉक, योग, व्यायामासाठी आलेल्या नागरिकांनी उद्यानातील गैरसोयींसह परिसरातील समस्याही मांडल्या. ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भातील निवेदन देण्यासाठी सहाय्यक आयुक्तांशी संपर्क साधला होता, त्यानुसार त्यांनी थेट उद्यानात येऊनच सकाळीच्या वेळेत पाहणी करीत समस्या समजावून घेतल्या.
उद्यानाची सकाळची वेळ 10 वरून 11 करणे, ओपन जिम मधील तुटलेले व निकामी झालेले साहित्य, प्रकाश व्यवस्था, पाण्याचा प्रश्न, उद्यानात येणारी टवाळ मुले, प्रेमी युगल, लहान मुलांची खेळणी असलेल्या भागात पुरेसा प्रकाश नसणे, अस्वच्छतेसह सुरक्षा रक्षक नसणे अशा समस्यांचा पाढाच यावेळी सहाय्यक आयुक्तांपुढे ज्येष्ठ नागरिकांनी मांडला. समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी सहाय्यक आयुक्तांनी दिले.
महापालीकेच्या मुख्य खात्यांतर्गत उद्यान विभाग येतो. सध्या, शिवरकर उद्यानाच्या सीमाभींतीसाठी लाखोचा खर्च केला जात आहे. सात एकर जागे मध्ये असलेल्या या उद्यानात पुरेसा प्रकाश नाही. कारंजासाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे. उद्यानातील विद्यूत, पाणी तसेच देखभालीसाठी लाखोच्या निवीदा काढण्यात येतात, असे असताना देखील उद्यानातील काही समस्या तशाच असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले.