लंडन – आठव्या शतकातील योगिनी देवीची प्राचीन मूर्ती ब्रिटनमधून भारतात परत पाठविली जाणार अहे. ही प्राचीन मूर्ती 40 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील मंदिरातून चोरीला गेली होती. ही मूर्ती आठव्या शतकातील असल्याचे म्हटले जाते.
ही मूर्ती 1970च्या उत्तरार्धात किंवा 1980च्या सुरुवातीला उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील लोकारी गावातील एका मंदिरातून चोरीला गेली होती. ही प्राचीन मूर्ती भारतात परत पाठवण्यासाठी औपचारिकता पूर्ण केली जात आहे, अशी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी पुष्टी केली आहे.
ट्रेड आणि इकॉनॉमिक अफेअर्सचे फर्स्ट सेक्रेटरी जसप्रीत सिंग सुखीजा म्हणाले, की लंडनमधील भारतीय उच्चायुक्त योगिनी देवीची मूर्ती परत घेण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. बहुतेक औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत आणि आम्ही मूर्ती परत घेण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत. ख्रिस मारिनेलो आणि विजय कुमार यांनी काही महिन्यांपूर्वी ही मूर्ती ओळखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. योगिनी देवीची मूर्ती लवकरच उच्चायुक्तांकडे सुपूर्द केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
“आर्ट रिकव्हरी इंटरनॅशनल’ या संस्थेचे संस्थापक मारिनेलो यांना ब्रिटनमधील एक महिला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर घरातून वस्तू विकत असताना ही मूर्ती सापडली होती. त्यानंतर मारिनेलो यांनी भारतातून चोरलेल्या सांस्कृतिक वस्तूंच्या पुनर्प्राप्तीसाठी समर्पित इंडिया प्राइड प्रोजेक्टचे सह-संस्थापक विजय कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ही मूर्ती ओळखल्यानंतर ही मूर्ती परत घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.