टेनेसी (केंटुकी, अमेरिका) – अमेरिकेतील केंटुकी प्रांतात आलेल्या चक्रीवादळातील बळींची संख्या 100हून अधिक झाली आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका केंटकी प्रांतासह इलिनॉइस येथील अमेझॉनच्या केंद्राला बसला आहे.
अमेरिकेत ताशी 320 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे 6 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. एकट्या केंटुकीमध्ये 70हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
केंटुकी राज्याच्या गव्हर्नर अँडी बेशिर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की केंटुकीमध्ये किमान 100 लोकांचा मृत्यू होण्याची भीती आहे आणि मृतांची संख्या 100 पेक्षा जास्त असू शकते. मला वाटते की हे आमच्या राज्याच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी चक्रीवादळ आहे, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, नॅशनल गार्डचे सदस्य आणि राज्यभरातील आपत्कालीन कर्मचारी शोध आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी मेफिल्डमध्ये येत आहेत. या प्रदेशात जोरदार चक्री वादळ आल्याने अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
केंटुकीमधील एक मेणबत्ती कारखाना, इलिनॉइसमधील अमेझॉनचे केंद्र, आर्कान्सामधील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. मेफिल्ड, केंटुकी येथील कारखान्यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या चक्रीवादळाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. यात चक्रीवादळानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे. यात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. इलिनॉइसच्या एडवर्डसविले येथील अमेझॉन वेअरहाऊसमध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.