पिंपरी – पिंपरी मधील एफ एफ आय चिटफंड कंपनीचे मालक आनंद उनवणे (वय 42, रा. मोरवाडी, पिंपरी) यांचे तीन फेब्रुवारी रोजी अपहरण करून चार फेब्रुवारी रोजी खून केला. या प्रकरणातील एका आरोपीच्या वडीलांना बेंगलोरमधून अटक केली. त्यांच्याकडून दागिने आणि रोख रक्कम असा 27 लाख 90 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुधीर मारुती मोरे असे बेंगलोर शहरातून अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून 49 लाख 61 हजार 338 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई केली.
दरम्यान आरोपी उमेश मोरे याचे वडील सुधीर मोरे या गुन्ह्यातील मुद्देमाल घेऊन फरार झाले. सुधीर मोरे हा बेंगलोर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सुधीर मोरे याला अटक केली. आरोपी सुधीर मोरे हा वेशांतर करून वेळोवेळी जागा बदलत असे. आरोपीने पाच महिन्यांच्या कालावधीत केवळ 18 कॉल केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. कॉल केल्यानंतर आरोपी मोबाइल बंद करून फिरत असे. आरोपी बेंगलोर शहरातील नागवारा येथील झोपडपट्टीवजा दाट लोकवस्तीत राहत होता. तिथून पोलिसांनी त्याला अटक केली.
आरोपी सुधीर मोरे याच्याकडून 387.940 ग्रॅम वजनाचे 17 लाख 45 हजार 730 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि दहा लाख 43 हजार 600 रु रुपये रोख रक्कम असा 27 लाख 90 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रभू पुजारी याच्या पत्नीने त्यांच्या वाट्याला आलेल्या रकमेपैकी सहा लाख 14 हजार 700 रुपये रोख रक्कम आठ जुलै रोजी पिंपरी पोलिसांकडे सादर केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत 83 लाख 66 हजार 768 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.