नवी दिल्ली – स्वयंरोजगारासह नोकरीच्या संधी वाढवण्यासाठी आणि महसूल मिळवण्यासाठी भारतीय रेल्वे एका नव्या आणि अभिनव अशा उत्कृष्ट कल्पनेवर काम करत आहे. रेल्वेच्या जुन्या बोगीचे (डबा) रुपांतर रेस्टॉरंटमध्ये करण्यात येत असून, ही संकल्पना लोकांना पसंत पडत आहे.
रेल्वे बोर्डाने या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात नाशिक येथे असे एक रेस्टॉरंट सुरू केले आहे. रेस्टॉरंटला भेट देणाऱ्या एका ग्राहकाने सांगितले की, येथे जेवण करण्याचा अनुभव वेगळा होता. आपण त्याला पॅलेस ऑफ फूड ऑन व्हील्स असेही म्हणू शकतो. सरकारचा हा चांगला उपक्रम आहे.
भारतीय रेल्वे आपला महसूल वाढवण्यासाठी आणि नोकऱ्या देण्यासाठी अनेक पुढाकार घेत आहे. याअंतर्गत रेल्वे डब्यात रेस्टॉरंट बांधण्यासोबतच प्रवाशांना प्रवासादरम्यान देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करण्याचीही तरतूद आहे. यासोबतच रेल्वेच्या बोगी व्यवसायासाठी देण्याची प्रक्रियाही सोपी केली जात आहे.
त्यामुळे अधिकाधिक लोक रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी रेल्वेशी संपर्क साधू शकतील.अशा बोगी वापरुन रेस्टॉरंटखेरीज अन्य व्यवसायही थाटता येतील असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.