मुंबई – यावर्षी आपण सर्वजण आपला 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. सध्या देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आजपासून ‘हर घर तिरंगा’अभियान राबवण्यात येत आहे.
त्यामुळे सर्वत्र आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण पसरलं आहे. या दिवशी देश भक्तीपर चित्रपटांमधून शुरवीरांच्या यशोगाथा दाखविल्या जातात. बॉलिवूडमध्ये देखील या मुद्द्यावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. चला तर मग जाणून घेऊया कोणते देशभक्तीपर चित्रपट आज ही भारतीयांच्या मनावर राज्य करत आहे.
बॉर्डर – 13 जून 1997 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बॉर्डर’ हा चित्रपट भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धावर आधारित आहे. या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली असून आजही ही गाणी प्रत्येक भारतीयांच्या ओठी दिसून येतात. बॉर्डर चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ, राखी, पूजा भट्ट, पुनित इस्सर अशी दमदार स्टार कास्ट आहे.
क्रांती – या चित्रपटामध्ये स्वातंत्र्यापूर्वीचा काळ दाखविण्यात आला आहे. ‘क्रांती’ चित्रपटात बॉलिवूडमधील दिग्ज अभिनेते मनोज कुमार, दिलीप कुमार, शत्रघ्न सिन्हा, परवीन बाबी, शशी कपूर, हेमा मालिनी यांची प्रमुख भूमिका आहे.
स्वदेश – आशुतोष गोवारीकर यांच्या 17 डिसेंबर 2014 ला प्रदर्शित झालेल्या ‘स्वदेश’ चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. शाहरुखने नासामधील एका वैज्ञानिकाची भूमिका वठविली असून आपल्या गावाच्या विकासासाठी तो नोकरी सोडून गावी जातो.
रंग दे बसंती – राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपटात आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, सिद्धार्थ आणि सोहा अली खान अशी स्टार कास्ट आहे. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.