पुणे – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. यामुळे शिक्षण सेवकांना आता 16 हजार ते 20 हजारांच्या दरम्यान दरमहा मानधन मिळणार आहे. दि. 1 जानेवारी 2023 पासून ही मानधन वाढ लागू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, नगरपालिका, महापालिका व मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांमध्ये 10 मार्च 2000 पासून शिक्षण सेवक योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती दिलेल्या व एस.एस.सी., एच.एस.सी. आणि डी.एड. अशी अर्हता असलेल्या उमेदवारांना दरमहा 2 हजार 500 रुपये तसेच अन्य अप्रशिक्षित उमेदवारांना दरमहा 1 हजार 500 रुपये एवढ मानधन देण्याची तरतूद करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत सुधारित शिक्षण सेवक योजना राबविण्यात आली. यात 3 हजार ते 5 हजार रुपये तसेच 17 सप्टेंबर 2011च्या शासन निर्णयानुसार सुधारित मानधन 6 हजार ते 9 हजार रुपये निश्चित करण्यात आले. त्यानंतर या मानधनात वाढ करण्यात आली नव्हती. वाढती महागाई आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या वेतनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी संघटनांकडून करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही याबाबतचे आदेश जारी केले होते. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली होती. यानुसार सदर मानधनात वाढ करण्यास शासनाने मान्यता दिली.