मुंबई – गुप्त माहितीच्या आधारावर, महसूल गुप्तचर संचालनालयाने 31 ऑगस्ट रोजी जवाहरलाल नेहरु बंदरात 1440 फुटी कंटेनर्स ताब्यात घेतले. या कंटेनरमधून सुपारीची तस्करी केली जात असल्याचे तपासादरम्यान उघड झाले. तळेगाव येथील अंतर्देशीय कंटेनर डेपो येथे पाठवण्यात येणार असलेल्या या कंटेनर्समध्ये सुपाऱ्या लपवलेल्या आहेत असा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
तळेगाव येथील डेपोमध्ये पोहोचण्यापुर्वीच हे चोरण्यात येतील किंवा बदलले जाऊन दुसऱ्या मार्गाने पाठवण्यात येतील असा संशय आल्याने हा माल जेएनपीटी बंदरातच थांबवून ताब्यात घेण्यात आला. आयातविषयक प्रकटीकरण तपशील तसेच बिलात या कंटेनर्समध्ये “कॅल्शियम नायट्रेट’ हे रसायन असणे अपेक्षित होते.
मात्र, कंटेनर्सची तपासणी केल्यानंतर सगळ्याच 14 कंटेनर्समध्ये सुपाऱ्या भरलेल्या असून कॅल्शियम नायट्रेटच्या नावाखाली त्यांची भारतात तस्करी करण्यात आली आहे. परदेशातून भारतात आयात केल्या जाणाऱ्या दर एक टन वजनाच्या सुपाऱ्यांवर केंद्र सरकार 10,379 अमेरिकी डॉलर्स इतके शुल्क आकारते.
म्हणजेच, आज ताब्यात घेण्यात आलेल्या 14 कंटेनर्स मधील एकूण 371 टन वजनाच्या सुमारे 32.31कोटी रुपयांच्या सुपाऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.