नवी दिल्ली – पुणेस्थित इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्सचे खगोल भौतिकशास्त्रज्ञ कनक साहा यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच डॉ. दिप्यामन गांगुली, डॉ. कनिष्क बिस्वास यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
सुप्रसिद्ध वैज्ञानिक शांती स्वरुप भटनागर यांच्या नावे विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैज्ञानिकांना दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत 2022 या वर्षासाठीच्या पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली असल्याचे सीएसआयआरचे महासंचालक डॉ. एन.कलैसेल्वी यांनी सांगितले. यंदा 12 शास्त्रज्ञांना सात श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आला आहे.
हे पुरस्कार भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, गणित, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र आणि पृथ्वी विज्ञान या सात वैज्ञानिक शाखांमध्ये दिले जातात. डॉ. कनक साहा यांना भौतिक विज्ञान श्रेणीतील पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
गणितीय विज्ञान श्रेणीतील पारितोषिक मुंबईस्थित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे अनिश घोष आणि चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसचे साकेत सौरभ यांना मिळाले आहे.