होलटिविला – एका एसयुव्ही वाहनाची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक होऊन कॅलिफोर्नियात झालेल्या एका अपघातात एसयुव्ही मधील 13 जण ठार झाले. या गाडीत तब्बल 25 जण बसवण्यात आले होते असे आढळून आले आहे. अमेरिका-मेक्सिको सीमे नजीकच हा अपघात झाला. त्यावरून या गाडीत मेक्सिको मधून आलेले घुसखोर बसवण्यात आले होते असे सांगितले जात असून त्या संबंधातील तपास आता सुरू आहे.
हे मानवी तस्करीचे प्रकरण आहे काय याचा अधिकारी तपास करीत आहेत असे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या एसयुव्ही वाहनाची क्षमता केवळ 8 प्रवाशांची आहे त्यात 25 जण चेंबुन बसवण्यात आले होते. त्यासाठी गाडीतील मागची सारी सीट्स काढून टाकण्यात आली होती. व हे प्रवासी तेथे कोंबुन बसवले गेले होते.
मेक्सिको सीमेतून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असते. अमेरिकेच्या हद्दीत घुसलेल्यांना मुख्य भूमित नेण्यासाठी या वाहनाचा उपयोग केला जात होता असेही सांगितले जात आहे. उर्वरीत 12 जखमींपैकी अनेक जण गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गाडीचा चालकही मेक्सिकोचाच नागरीक आहे.
या भागापासून मेक्सिको सीमा अगदी जवळ आहे. तेथे सध्या फार बंदोबस्त नाही. त्याचा गैरफायदा घेत मेक्सिकोतून शकडो नागरीक दररारेज अमेरिकेत प्रवेश करतात.