पारनेर -पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा तेथे मुंबईहून आलेल्या 46 वर्षीय व्यक्तीला करोना बाधित आढळून आल्यानंतर त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये त्याची 18 वर्षीय मुलगी करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
तालुक्यातील हिवरे कोरडा येथील करोना बधिताच्या एका 18 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर दुसरी 16 वर्षीय मुलगी, पत्नी व आई यांच्यासह तपासणीला पाठविलेल्या आठ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
भाळवणी येथील ते डॉक्टर आणि संपर्कात आलेल्या त्या व्यक्तींचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. काल माळकूप येथून जिल्हा रुग्णालयात पाठविलेल्या त्या व्यक्तीचा अहवाल ही निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. लाळगे यांनी दिली. तालुक्यामध्ये करोनाचे एकूण चार बाधित आढळले असून त्यातील पिंपरी जलसेन येथील एकाचा मृत्यू झाला आहे. हिवरे कोरडा येथील दोन व म्हसने येथील एक अशा तिघांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे यापुढील काळामध्ये तालुक्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे.