मुंबई – अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. बुकी अनिल जयसिंघानी यांना गुजरातमध्ये अटक करताच मुंबई पोलिसांना तपासात अनेक प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. आरोपी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षाबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
पोलिसांना सांगितले आहे की,’उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणारे आरोपी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा यांनी मिळून कट रचला होता. अमृता फडणवीस यांच्या मोबाईलवर कुठलाही व्हॉट्सअप मेसेज पाठवण्याआधी अनिक्षा तिच्या वडिलांशी चर्चा करत असे. तपासावेळी पोलिसांना एक मोबाईल आणि त्यातील मेसेजचे स्क्रीनशॉट्स सापडले जे अमृता फडणवीस यांना पाठवले जाणार होते. या बाप लेकींमध्ये खूपदा चर्चा व्हायची. त्यामुळे बाप-लेक मिळून अमृता फडणवीसांना फसवण्याचा कट रचत होते हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून फरार असणारा अनिल जयसिंघानी याला अटक करण्यासाठी विशेष ऑपरेशन राबवण्यात आले. अनिल जयसिंघानी इंटरनेटचा वापर करून अनेकांच्या संपर्कात होता. आरोपीवर विविध राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन ओळख लपवून राहत होता.
आरोपी हा महाराष्ट्रातून शिर्डी, शिर्डीतून गुजरातच्या बरदोली येथे गेल्याची माहिती समोर आली होती. या आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली होती. आरोपीने 72 तास गुजरातमध्ये पोलिसांना चकवा दिला होता. रात्री 11: 45 ला त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अनिल जयसिंघानी याच्यासोबत त्याचा ड्रायव्हर आणि त्याचा एक नातेवाईक यालाही अटक करण्यात आली आहे.
अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानीला देखील अटक करण्यात आली आहे. अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. फॅशन डिझायनर असल्याचे सांगत अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधली, पुस्तकाचे प्रकाशन केले आणि त्यानंतर वडिलांची फसवणूक झाल्याचे सांगत मदत करण्याची मागणी केली होती.