पॅरिस : रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला आता १ वर्ष पूर्ण झाले आहे. या युद्धाचे चटके सगळ्याच जगाला सहन करावे लागले आहेत.दरम्यान, या सगळ्यात यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या अटकेसाठी वॉरंटदेखील जरी केले होते. मात्र या वॉरंटला न जुमानता आता पुतीन यांनी चक्क जगालाच धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या वर्षभरापासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी गेल्या आठवड्यात शुक्रवारी व्लादिमिर पुतीन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते.त्यांच्यावर युक्रेनमधून बेकायदेशीररीत्या हजारो मुलांना देशाबाहेर काढल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. तसेच, या युद्धामध्ये घडलेल्या बेकायदेशीर बाबींसाठी पुतीन वैयक्तिकरीत्या दोषी असल्याचा निर्वाळा या न्यायालयाने केला आहे.
दरम्यान, एकीकडे पुतीन यांना अटक होणार का? यावर मोठ्या प्रामाणावर अनिश्चितता निर्माण झालेली असताना त्याचा विरोध करण्यासाठी रशियानं संपूर्ण जगालाच युद्धाची धमकी दिली आहे. “पुतीन यांना अटक करण्याचा कोणताही प्रयत्न म्हणजे अप्रत्यक्षरीत्या युद्धाची घोषणाच असेल”, अशी थेट धमकी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पुतीन यांच्या सुरक्षा कौन्सिलचे विद्यमान उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी दिली आहे.
“जरा कल्पना करा की एका अण्वस्त्रधारी देशाचा विद्यमान प्रमुख दुसऱ्या एखाद्या देशात गेला, उदाहरणार्थ जर्मनीमध्ये गेला आणि तिथे त्याला अटक झाली, तर त्याचे परिणाम काय होतील? अर्थात, ती रशियन फेडरेशनविरोधात युद्धाची घोषणाच ठरेल. मग अशा परिस्थिती आमची सर्व संरक्षण आणि हल्ला प्रणाली कार्यान्वित होईल. मग रशिया कोणत्याही देशावर बॉम्बहल्ला करू शकतो”, असा इशाराच मेदवेदेव यांनी दिला आहे.त्यामुळे आता त्यांनी दिलेल्या या इशाऱ्यावर जगातून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणे गरजेचे आहे.