Amol Mitkari । शरद पवार यांच्या गटात युगेंद्र जोगेंद्र कुणीही येऊ द्या. पण आता लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात बरेच नेते व आमदार काम करताना दिसतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांना इशारा देताना दिला.
मिटकरी म्हणाले की, मी अनिल तटकरे, युगेंद्र पवार यांचे नाव प्रथमच ऐकले. यापैकी युगेंद्र हे श्रीनिवास पवारांचे सुपुत्र असल्याचे हे मला नंतर समजले. आम्ही त्यांची काहीही अडचण नाही. पण त्या गटातील बालमित्र मंडळाच्या अध्यक्षांसाठी ही धोक्याची घंटा आहे.
अजितदादा होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना रोखण्यासाठी शरद पवार यांनी युगेंद्र पवारांना आणले आहे. त्यामुळे रोहित पवारांनी फार हवेत जाऊ नये. मिटकरी यांनी यावेळी पवार व तटकरे कुटुंबात वितुष्ट आणण्याचे काम मुंब्र्यातून सुरू असल्याचा दावा करत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.
राष्ट्रवादीला ४ हून जास्त जागा मिळणार । Amol Mitkari
राष्ट्रवादीकडे सध्या ४ खासदार आहेत. आम्ही महायुतीत १० जागांची मागणी केली आहे. आमची मागणी पूर्ण झाली तर आम्ही निश्चितच आमची ताकद दाखवू.
लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्यावर आमचा भर असेल, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ४ हून अधिक जागा दिसतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
काँग्रेसचे ७ पवारांचे ५ आमदार संपर्कात । Amol Mitkari
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आमच्या पक्षात अनेक नेते येतील. काँग्रेसचे ७ व शरद पवार गटातील ५ आमदारांची अजित पवार यांच्याशी चर्चा सुरू आहे. काल अजित पवारांच्या बंगल्यावरही शरद पवार गटातील एक महत्त्वाचा नेता भेटीला आला होता.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल यात कोणतीही शंका नाही. बरेच नेते व आमदार अजित पवार यांच्या नेतृत्वात काम करताना दिसतील, असेही मिटकरी यावेळी बोलताना म्हणाले.