Amol Kolhe and Shivaji Adahrao Patil| शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. यानंतर आता शिरुर मतदार संघात शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लढत होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यानुसार दोन्ही नेत्यांनी कामाला सुरुवात केली आहे. मात्र यादरम्यान आज हे दोन्ही नेते शिवनेरी किल्ल्यावर आमने-सामने आले. यावेळी दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. सध्या त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
यावेळी शिवाजी आढळराव पाटील यांना पाहताच अमोल कोल्हे यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. याचदरम्यान एक चिमुकला “मला तुमची मालिका खूप आवडली,” असे अमोल कोल्हे यांना म्हणताना दिसतो. त्यावर अमोल कोल्हे त्याला हसत ‘थॅंक्यु’ म्हणताना दिसतात.
राजकारण हा पिंड नाही…
“शिवसंस्कार” हाच आमचा पिंड !#chatrapathishivajimaharaj #shivajimaharaj #amolkolhe #shivneri #junnar pic.twitter.com/XJdrVV2GA0— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 28, 2024
यावेळी माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, ते वयाने मोठे आहेत. ही आपली संस्कृती आहे. सध्या द्वेषाचे राजकारण सुरू झालेलं आहे. या पलिकडे जाऊन सर्वांनी राजकारणातील ही सुसंस्कृतता जपली पाहिजे, ‘ असंही अमोल कोल्हे म्हणाले.
तर शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, “शिवरायांच्या शिवनेरीच्या पायथ्याशी माथा टेकून मी आज माझ्या प्रचाराची सुरुवात केली आहे. यापुढे प्रचारादरम्यान आणि निवडून आल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दुधाच्या भावाचे प्रश्न सोडविण्यावर माझा भर असणार आहे.मी शेतकरी आहे, शेतीतील माणूस असल्यामुळे मला त्यांच्या प्रश्नांची आणि अडचणींची जाणिव आहे. शिवनेरीच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन मी माझ्या प्रचाराची सुरुवात केली आहे,” असंही पाटील म्हणाले.
पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील लढत ?
शिवाजी आढळराव पाटील यांनी 2004 साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. 20 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून काम केलं. त्यानंतर आता पुन्हा शिवसेना पक्षातून त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
डॉ. अमोल कोल्हे यांच्याविषयी बोलायचे झाले तर, त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना 2019 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली. त्यात त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा: