देशभरात करोना व्हायरसचा कहर सुरू आहे. अलीकडेच बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर पुन्हा एकदा अमिताभ कामावर परतले आहेत. ते “कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रम होस्ट करताना दिसणार आहेत.
या शोदरम्यान अमिताभ बच्चन अनेकदा आपल्या आयुष्याबद्दलही बोलतात. त्यातच अमिताभ यांनी या शोमध्ये करोना साथीच्या काळातील आपले जीवन आणि नात आराध्याबाबतच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, त्यांची नात आराध्याने त्यांना करोनाचा खरा अर्थ सांगितला आहे. यामुळे त्यांचा करोनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा कसा बदलला हेही त्यांनी सांगितले. बिग बी म्हणाले, माझी नात आराध्या बच्चन केबीसी पाहात होती आणि म्हणाली, तुम्हाला माहिती का, या करोनाचा खरा अर्थ नवीन असा होतो.
प्रत्यक्षात तो “करो ना’ असा आहे, म्हणजे, “करू नका’. मला ते विलक्षण असे वाटले. अमिताभ बच्चन म्हणाले, “सोप्या शब्दांत सांगायचे तर तुम्ही असे काहीही करू नका. ज्यामुळे या विषाणूचा प्रसार होण्यास संधी मिळेल. सोशल डिस्टंन्सिगचे पालन करण्यापासून अन्य सर्व नियमांचे पालन करत करोनाविरोधातील लढ्यात योगदान देऊ शकतो.’