मुंबई – सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात करण्यात आलेले हेडकॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न दीड कोटी रूपये इतके असल्याची बाब वृत्तपत्रातील बातमीद्वारे सर्वांना समजली होती. त्या पार्श्वभूमीवर ही बदली झाली असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांची ही बदली रूटीन आहे असे पोलिस दलाकडून सांगण्यात आले आहे.
त्यांना आता डी. बी मार्ग पोलिस ठाण्यात नेमण्यात आले आहे. पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले आहे की त्यांची पंधरा दिवसांपुर्वीच बदली करण्यात आली होती आणि त्याच वेळी त्या विषयीची सुचना जारी करण्यात आली होती असेही पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले आहे. बच्चन यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
त्यानुसार सन 2015 पासून शिंदे हे त्यांचे अंगरक्षक म्हणून सेवा बजावत होते. ते बच्चन यांच्या विश्वासातले मानले जात होते. पोलिसांच्या नियमानुसार कोणताही कर्मचारी एकाच ठिकाणी पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा करू शकत नाही. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे असे सांगितले गेले असले तरी त्यांचे वार्षिक उत्पन्न दीड कोटींपेक्षा अधिक असल्याची बाब उघड झाल्याने त्यांच्या बदलीला महत्व दिले जात आहे.
शिंदे यांची पत्नी सिक्युरिटी एजन्सी चालवते. महत्वाच्या व्यक्तींना अंगरक्षक पुरवण्याचे काम या एजन्सी मार्फत केले जाते असे सांगण्यात येते. शिंदे यांनी आपल्या उत्पन्नाचा तपशील पोलिस डिपार्टमेंटला नियमानुसार कळवला आहे की नाही हे सध्या तपासले जात आहे असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.