अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर नेहमी ऍक्टिव्ह असतात. त्यांना आवडलेल्या गोष्टींना ते सोशल मिडीयावरून दाद देतात. काही जणांची चेष्ठा मस्करीही करत असतात. अशातच त्यांना हिंदीचा शुद्ध आविष्कार लोकांपुढे सादर करण्याची हुक्की आली. “सेल्फी’ या शब्दाला हिंदीमध्ये काय म्हणता येऊ शकेल, याचा शोध बच्चन यांनी लावला आहे.
“सेल्फी’ला हिंदीमध्ये “व्यक्तिगत दूरभाषित यंत्र से हस्त उत्पादित स्व चित्र’ असे म्हणता येऊ शकेल, अशी बहुमोल माहिती बच्चन यांनी ट्विटरवर दिली आहे. या लांबलचक शुद्ध हिंदी शब्दाचा संक्षेप “व द य स ह उ स च’ असा करता येईल,आणि त्याचा उच्चार “वदय सह उसच’ असाही करता येईल, असे बच्चन यांनी म्हटले आहे. त्यांचे हे ट्विट खूप वेगाने व्हायरल झाले आहे आणि त्यांच्या या ट्विटवर भरपूर कॉमेंटही पडल्या आहेत.
बच्चन आगामी “ब्रम्हास्त्र’मध्ये असणार आहेत. याशिवाय “गुलाबो सिताबो’मध्येही त्यांनी एक महत्वाचा रोल केला आहे. याशिवाय “झुंड’ आणि “चेहरे’ हे त्यांचे आणखी काही आगामी सिनेमे असणार आहेत. एवढे बिझी असतानाही त्यांची विनोदबुद्धी कायम आहे, हे आश्चर्य आहे.