पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यात कार्यक्रमांची रेलचेल होती. परंतु त्याचा परिणाम म्हणजे कसबा पोटनिवडणुकीतील वातावरण ढवळून निघाले. अमित शहांच्या कार्यक्रमामुळे मिळालेली ऊर्जा घेऊन कार्यकर्ते दुप्पट उत्साहाने प्रचारात उतरलेले पाहायला मिळाले.
शहा यांचा पुणे दौरा हा काही सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने होता. त्यात “मोदी ऍट 20′ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रम होता. शिवसृष्टीचे उद्घाटन, हे प्रमुख जाहीर कार्यक्रम होते. महाशिवरात्रीचे निमित्त साधून अमित शहांनी थेट ओंकारेश्वराच्या मंदिरात जाऊन घेतलेले दर्शन हा कसब्याच्या दृष्टीने महत्वाची घडामोड होती. महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविक ओंकारेश्वराच्या दर्शनाला आलेले होते.
अमित शहा दर्शनासाठी येत असल्यामुळे भाजपाचेही कसब्यातील शेकडो कार्यकर्ते तेथे दाखल झाले. कसब्यातील हजारो नागरिकही अमित शहा यांच्या कुतूहलापोटी रस्त्यावर येऊन उभे होते. शहा यांनीही कार्यकर्ते आणि गर्दीलाही नाराज न करता, हसतमुखाने अभिवादन केले, हात जोडून त्यांना अभिवादन केले. त्याच्यामुळे एकच जल्लोष मंदिराच्या आणि बालगंधर्व पुलावर झाला. केदारनाथ, काशीविश्वेश्वर, उज्जैन महाकाल, या मंदिरांना पुन्हा झळाळी भाजपच्याच राजवटीत मिळाली आणि ओंकारेश्वरालाही नवे रूप देत असतांना त्याच्यात सिंहाचा वाटा खासदार गिरीश बापट यांचा आहे. भाजपाच्या सांस्कृतिक राजकारणात हिंदुत्वाच्या अभिव्यक्तीला असलेल्या महत्त्वाबद्दल नागरिकांत चर्चा रंगलेली होती.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे कसब्याच्या प्रचारात उतरू न शकलेल्या खासदार गिरीश बापट यांनी दोनच दिवसांपूर्वी कसब्याच्या विजयासाठी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत त्यांना प्रेरणा दिली. त्यांची विचारपूस करण्यासाठी अमित शहा गेल्यावरही शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गर्दी केली होती. व्यस्त कार्यक्रमानंतरही बापट यांची भेट घेऊन विचारपूस करण्यास अमित शहा गेल्याने कार्यकर्त्यांना एक प्रकारे भावनिक सादच घातली गेली. “मोदी ऍट20′ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात तर शहरातून भाजपाचे पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते आलेले होते. तब्बल दोन तास उशिराने आलेल्या अमित शहा यांनी “मोदी गेल्या 21 वर्षांत एकही निवडणूक हरलेली नसल्याचे सांगून जीव ओतून भाजपाच्या विजयासाठी कष्ट करा,’ असा संदेशही दिला आणि अत्यंत जोषपूर्ण भाषण करीत कार्यकर्त्यांची मने जिंकून घेतली. कसब्याच्या गडावरील वर्चस्व राखण्यासाठी त्यांच्या या भाषणाने आणखी ऊर्जा निर्माण केली.