पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी सायंकाळी सीमा सुरक्षा दलाच्या विशेष विमानाने शाह यांचे लोहगाव विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा हा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी अमित शाहंनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर शाह यांनी गिरीश बापट यांची देखील भेट घेतली आहे. गिरीश बापट यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाग घेतल्यानंतर त्यांची प्रकृती खालवल्याचं काही राजकीय नेत्यांनी म्हटलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी काल गिरीश बापट यांची भेट घेतली.
दरम्यान, अमित शहा यांच्या भेटीनंतर गिरीश बापट यांची प्रकृती आता उत्तम असल्याचे त्यांचा मुलगा गौरव बापट यांनी सांगितल आहे. गिरीश बापट यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आठवड्यातून दोन ते तीन वेळेस डायलिसिस करण्यासाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागतं. त्यांची प्रकृती उत्तम आहे हळूहळू सुधारणा होत आहे फक्त थोडा आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे गौरव बापट यांनी सांगितले.