महाबळेश्वरमध्ये घरवापसी सुरू; राष्ट्रवादीची ताकद वाढणार
महाबळेश्वर – भाजपने दाखविलेल्या आमिषांना बळी पडून त्या पक्षात गेलेल्या महाबळेश्वरमधील नगरसेवक व कार्यकर्त्यांचा आता भ्रमनिरास झाला असून त्यातील अनेक जण स्वगृही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये परत येत आहेत. महाबळेश्वरातील या घरवापसीमुळे वाई विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार मदन भोसले यांची डोकेदुखी वाढली असून राष्ट्रवादीचे उमेदवार आ. मकरंद पाटील यांची ताकद वाढली आहे.
गेल्या दोन महिन्यांमध्ये महाबळेश्वरच्या काही नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी भाजपमध्ये यावे यासाठी पालिकेतील नेतृत्वाने त्यांना अनेक आमिषे दाखविल्याचे बोलले जाते. शिवसेना व राष्ट्रवादीचे काही नगरसेवक मोहाला बळी पडून भाजपमध्ये गेले; परंतु त्यांना देण्यात आलेली आश्वासने दोन महिने होऊनही पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नसल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. भाजपने आपली फसवणूक केल्याची खात्री पटल्याने पक्षांतर केलेले नगरसेवक आता त्याची जाहीर कबुली देत आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीची संधी चालून आल्याने पक्षांतर केलेल्या काही नगरसेविकांनी घरवापसीचा निर्णय घेतला. त्यांनी उघडपणे भाजपच्या विरोधात निवडणूक प्रचार सुरू केला आहे. श्रद्धा रोकडे व आफरिन वारूणकर या नगरसेविकांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीचा प्रचार सुरू केला आहे.
श्रद्धा रोकडे यांचे पती व आफरिन वारूणकर यांच्या बंधूंनी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदयात्रा, सभा रॅलींमध्ये भाग घेणे सुरू केले आहे. या दोन नगरसविकांचे नातेवाईक राष्ट्रवादीचा प्रचार करत असल्याने दोन्ही नगरसेविकांनी घरवापसी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे गटालाही हा जबर हादरा मानला जात आहे. या दोन्ही नगरसेविका स्वप्नाली शिंदेंच्या विश्वासू मानल्या जात होत्या. या दोघींच्या भूमिकेचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला नक्कीच फायदा होणार आहे.
शिवसेनेच्या नगरसेविका विमल पार्टे यांनीही महायुतीच्या उमेदवाराऐवजी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. त्यांनाही भाजपमध्ये येण्यासाठी आमिष दाखविण्यात आले होते; परंतु पार्टे यांनी आश्वासनांवर विश्वास न ठेवता मूळ पक्षात परत येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आघाडीचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांचे चिरंजीज सतोष पार्टे यांनीही आ. मकरंद पाटील यांचा प्रचार सुरू केला आहे. या घडामोडीमुळे पालिकेतील राजकीय नाट्य पुढील काळात रंगणार असल्याची चर्चा आहे.