खंडाळा, (प्रतिनिधी)- शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात जमीन विक्रीच्या इसारासाठी घेतलेले पैसे माघारी मागितल्याच्या कारणातून पतीला शिवीगाळ करत पत्नीचा विनयभंग करून पुण्यातील गुंड बाबा बोडके याला बोलवून तुझ्याकडून पैसे वसूल करतो अशी धमकी दिल्याप्रकरणी जमीन खरेदी- विक्री करणारा दलाल भगवान आवळे याच्याविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीसार एका गावात ४३ वर्षीय महिला कुटुंबीयांसोबत राहते. महिलेच्या पतीच्या मालकीची ६७ गुंठे जागा विकण्याकरिता दोन वर्षांपूर्वी खरेदी- विक्री दलाल भगवान आवळे यांच्यामार्फत पुणे येथील मानव ओसवाल यांना नोटरी इसार पावती करून देण्यात आली होती.
यावेळी १ लाख २५ हजार रुपये रक्कम संबंधित महिलेच्या पतीला मानव ओसवाल यांनी दिले होते. काही कारणास्तव जमिनीचा व्यवहार होऊ शकला नाही. यावर मानव ओसवाल व दलाल आवळे हे दोघेही महिलेच्या पतीला वारंवार पैसे परत मागत होते. मंगळवार दि. ३० रोजी दुपारच्या सुमारास भगवान आवळे या महिलेच्या घरात आला व जमिनीसाठी घेतलेले पैसे परत मागू लागला.
यावेळी संबंधित महिलेच्या पतीने माझ्याकडे पैसे नाहीत, आल्यानंतर देतो असे सांगितले असता शिवीगाळ करत तो घरात घुसला. यावेळी वाद मिटवण्यासाठी महिला मध्ये आली असता भगवान आवळे यांनी महिलेचा विनयभंग केला. यावेळी आरडाओरडा केल्याने भगवान आवळे यांनी संबंधित पती- पत्नीला पुण्यातील गुंड बाबा बोडके यांना बोलवून तुझ्याकडून पैसे वसूल करतो अशी धमकी दिली व तो घटनास्थळावरून निघून गेला.
या प्रकरणातून घाबरलेल्या महिलेने शिरवळ पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी भगवान आवळे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार सुरेश मोरे तपास करत आहेत.