वॉशिग्टन: कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलेलं असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर औषध शोधल्याचा दावा केला आहे. मलेरियाच्या औषधाचा वापर करुन कोरोना व्हायरसवर उपचार करण्यास अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
चीनच्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या या कोरोना व्हायरसने आता जगभरातील अनेक देशांमध्ये पाय पसरते आहेत. या कोरोना व्हायरसची साखळी तोडणे दिवसेंदिवस कठीण बनलं आहे. अशात यावर कोणताही इलाज किंवा औषध उपलब्ध नसल्याने सर्वांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र अमेरिकेने मलेरियाच्या औषधाला कोरोनावर उपचारासाठी मंजुरी देऊन भीती काहीशी कमी केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसवर उपचारासाठी मलेरियाच्या औषधाला मंजुरी देण्यात आली आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन असं या औषधाचं नाव आहे. या औषधाने कोरोना व्हायवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे, तसं परीक्षण करण्यात आलं असून परिणाम सकारात्मक आहे.
जगभरात दोन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जवळपास 9 हजारहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारतात ही गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. तर आतापर्यंत 200 जणांना देशात कोरोनाची लागण झाली आहे, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.