न्युयॉर्क – भारताचा अव्वल टेनिसपटू रोहन बोपण्णा याने कॅनडाचा सहकारी खेळाडू डेनिस शापलोव्ह याच्या साथीत खेळताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
बोपण्णा व शापलोव्ह या जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात केविन क्रावीत्झ व आंद्रेस मेइस या जोडीचा 4-6, 6-4, 6-3 असा पराभव केला. हा सामना एक तास 47 मिनिटे चालला. त्यात बोपण्णा व शापलोव्ह या जोडीला पहिला सेट गमवावा लागला होता. मात्र, या जोडीने नंतर आपला खेळ उंचावला व दोन सेट जिंकत सामना खिशात टाकला. पहिल्या फेरीपासून ही जोडी भरात आहे.
या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच बोपण्णाने कॅनडाच्या सहकारी खेळाडू शापलोव्हच्या साथीत दुहेरीत सातत्याने वर्चस्व राखले आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना नेदरलॅण्ड्सचा जील ज्युलियन रॉजर व रुमानियाचा होरिया टेकयू या जोडीशी होणार आहे.
भारताचा उद्योन्मुख खेळाडू सुमीत नागल व दीवीज शरण यांच्या पराभवानंतर आता केवळ भारताचे या स्पर्धेतील आव्हान बोपण्णावरच टिकून आहे.