मुंबई – आता अँम्बुलन्समधून पैसे खाण्याचा प्रकार महायुतीत सुरु झाला. सनदी अधिकाऱ्यांना बदलीची भीती दाखवून कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढल्याचे समोर आले आहे. १० दिवस टेंडरची मुदत ठेवली होती, ज्यात वर्किंग दिवस हे फक्त ६ होते. टेंडरची रक्कम फुगवण्यात आली होती. सरकार १५२९ अँम्बुलन्स खरेदी करणार आहे, असे विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
साधारणपणे कार्डिएक सुविधा असलेल्या एका अँम्ब्युलन्सची किंमत ५० लाखाच्या आसपास असते. १५२९ अँम्ब्युलन्सचे प्रति अँम्ब्युलन्स ५० लाख या प्रमाणे एकूण ७६४ कोटी ५० लाख रूपये होतात. ८०० कोटी रूपयात होणाऱ्या या कामासाठी ८ हजार कोटी खर्च करण्यामागे महायुतीत सरकारमधील मंत्र्यांची काय योजना आहे हे राज्यातील जनतेला माहित आहे.
अॅम्ब्युलन्समधून पैसे खाण्याचा नवा धंदा सरकारमधील काही मंडळींनी सुरू केला आहे. सनदी अधिकाऱ्यांना ‘बदली’ची भीती दाखवून साडेतीन-चार हजार कोटींचे टेंडर ८ हजार कोटीपर्यंत फुगवल्याचे उघड झाले आहे. महायुती सरकारमधील अँम्ब्युलन्स घोटाळा आता उघड झाला असून अँम्ब्युलन्स पुरवठ्याचे टेंडर सरकारने रद्द करावे, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी ही आमची मागणी आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
गेंड्याच्या कातडीचे सरकार
गेंड्याच्या कातडीचे हे सरकार आहे. तिन्ही सत्तेतले पक्ष मिळून सामूहिकपद्धतीने हे घोटाळे करत आहेत. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन अधिकाऱ्याच्या निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करत आहोत, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.