नवी दिल्ली – ऍमेझॉन आणि फ्युचर ग्रुपच्या भारतातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना ईडीने समन्स जारी केले आहे. या दोन्ही ग्रुप मध्ये 2019 मध्ये विलिनीकरणाचे डील झाले आहे. यात विदेश चलन नियंत्रण कायद्याचा भंग झाल्याचा आरोप आहे.
त्यामुळे ईडीने या दोन्ही कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना या संबंधात स्पष्टीकरण देण्यासाठी समन्स जारी केले आहे. ऍमेझॉन कंपनीचे भारतातील प्रमुख अमित आगरवाल आणि फ्युचर ग्रुपच्या प्रमुखांना त्यांच्यातील कराराच्या कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
ऍमेझॉन कंपनी आणि फ्लिकार्ट या कंपन्या वेगळ्या मार्गाने देशातील मल्टिब्रॅंड रिटेल व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत असे निरीक्षण दिल्ली हायकोर्टानेही या आधी नोंदवले आहे. काही दिवसांपुर्वी ऍमेझॉनने ईडीला संबंधीत कागदपत्रे पाठवली असून त्याचा अभ्यास केल्यानंतर ईडीने त्यांना हे समन्स जारी केले आहे.
फ्युचर ग्रुपचे प्रमुख किशोर बियानी यांनी मुकेश अंबानी यांच्या ग्रुपला आपल्या ग्रुपची सारी मालमत्ता 24 हजार 500 कोटी रूपयांना विकण्याचा करार केला आहे. पण या कराराला ऍमेझॉन कंपनीने आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, फ्युचर ग्रुपचा आमच्याशी 2019 ला गुंतवणूक करार झाला आहे. त्यांनी आमचा करार मोडून अंबानी यांच्या ग्रुपशी करार केला आहे. या प्रकरणी त्यांनी कोर्टातही धाव घेतली आहे.