नवी दिल्ली – भारतातील उद्योग जगताचे लक्ष लागलेल्या ऍमेझॉन -फ्यूचर कुपन्स दरम्यानचा व्यवहार स्पर्धा आयोगाने स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर स्पर्धा योगाने ऍमेझॉन कंपनीला योग्य माहिती सादर न केल्याबद्दल तब्बल 202 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या अगोदरच्या माहितीच्या आधारावर स्पर्धा आयोगाने अमेझॉन आणि फ्युचर दरम्यानच्या व्यवहाराला मंजुरी दिली होती. या अगोदर ऍमेझॉन कंपनीने फ्युचर कुपन्स मधील 49 टक्के भाग भांडवल घेण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही कंपन्यांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारावर हा नोव्हेंबर 2019 मध्ये स्पर्धा आयोगाने या व्यवहाराला मंजुरी दिली होती.
त्यानंतर फेरविचारासाठी हे प्रकरण पुन्हा स्पर्धा आयोगाकडे गेले. आता स्पर्धा आयोगाने दिलेल्या 57 पानी निर्णयांमध्ये म्हटले आहे की, या अगोदर दिलेली मंजुरी स्थगित करण्यात आली आहे. ऍमेझॉन कंपनीने या अगोदर दिलेली माहिती योग्य पद्धतीने सादर केली नसल्याचे स्पर्धा आयोगाने म्हटले आहे. त्यानंतर ऍमेझॉन आणि फ्युचर्स समुहादरम्यान कमालीचे मतभेद झाले होते. त्यानंतर फ्युचर समूहाने यासंदर्भात स्पर्धा आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. स्पर्धा आयोगाने जुलै 2019 मध्ये अमेझॉन कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर सुनावणी होऊन आज निर्णय जाहीर करण्यात आला.
दरम्यानच्या काळात फ्युचर समूहाने मुकेश अंबानी संचलित रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर व्यवहार केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने फ्युचर समूहातील कंपन्यांचे अधिग्रहण करण्याचा व्यवहार केला आहे. या व्यवहाराला ऍमेझॉन समूहाने जागतिक लवादासमोर आव्हान दिले होते. जागतिक लवादाने अंतरिम निर्णयामध्ये फ्युचर समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रीज दरम्यानच्या व्यवहाराला स्थगिती दिलेली आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय लागलेला नाही. यासंदर्भात परस्परावर आरोप केले जात असून या संबंधातील याचिका भारतातील विविध न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.