प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 -गणपती बाप्पाच्या आगमनामुळे पुणे शहर ढोल-ताशांच्या गजरासह बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमून गेले आहे. घरगुती गणेशोत्सवामध्ये काही भाविक हे पाचव्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. तर काही भाविक हे गौरीनंतर सातव्या दिवशी आणि नवव्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. सातव्या दिवशी काही मंडळांकडून मिरवणुका काढत विसर्जन केले जाते. त्यामुळे ही मिरवणूक निर्विघ्न आणि शांततेत पार पडावी, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुणे पोलिसांच्या बंदोबस्तासह वाहतूक विभागाकडून विसर्जन मार्गासह विसर्जन घाट परिसरातील वाहतुकीत बदल करून पार्किंग व्यवस्था केली आहे.
दि. 4 सप्टेंबर रोजी उत्सवाचा पाचवा दिवस, दि. 6 रोजी सातवा तर दि. 8 रोजी नववा दिवस येत आहे. बहुतांश भाविक घरगुती गणपतीचे विसर्जन घरीच छोट्याशा टाकीमध्ये करतात. तर काही भाविक महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या हौदामध्ये करतात. मंडळाचे मोठे गणपती तसेच काही भाविकांची मुठा नदीपात्रामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गर्दी होते. त्यावेळी विसर्जन घाटावर होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाकडून उपाययोजना करण्यात आली आहे.
विसर्जन घाट आणि पार्किंग व्यवस्था
विसर्जन घाट : अप्सरा टॉकीजजवळील कॅनॉल
पार्किंग : नेहरू रस्त्यावर वाहने अप्सरा टॉकीजच्या बाजूस पार्क करावीत.
विसर्जन घाट : चिमाजी आप्पा पेशवे पथावरील सावरकर पुतळ्याजवळील कॅनॉल (मित्र मंडळ सावरकर चौक दरम्यान)
पार्किंग : चिमाजी आप्पा पेशवे पथावर कॅनॉलच्या पुढे मित्र मंडळ चौकापर्यंत पाटील प्लाझाच्या डाव्या बाजूस तसेच सावरकर पुतळा चौकापासून पेशवे पार्क व सिंहगड रोडवर सारसबागेच्या बाजूस पार्क करावीत.
विसर्जन घाट : संगम पूल घाट (आरटीओजवळ मोतीलाल रस्त्यावर)
पार्किंग : संगम पूल येथील राजाबहादुर मिल रोडवर जुने सीआयडी कार्यालय ते आरटीओ चौक येथे दोन्ही बाजूस भिंतीस लागून पार्क करावीत. तसेच एसएसपीएमएस ग्राऊंडच्या बाजूसही वाहने पार्क करावीत.
विसर्जन घाट : एसएम जोशी पुलाखाली (गरवारे कॉलेजमागे)
पार्किंग : एसएम जोशी पुलाजवळ गरवारे कॉलेजच्या मागील बाजूस व ठोसर बागेसमोरील स्टेट बॅंक (वैकुंठ स्मशानभूमी रोड)
विसर्जन घाट : बाबा भिडे पूल दोन्ही बाजूस (डेक्कन पीएमपीएमएल बसस्टॉपजवळ)
पार्किंग : बाबा भिडे पुलाच्या दोन्ही बाजूस नदीपात्रातील मोकळी जागा.