पुणे – मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुणे शहरातही खासगी वाहनातून एकत्र प्रवास करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना विनामास्क मुभा द्यावी, अशी मागणी नगरसेविका मंजुषा नागपूरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
करोनामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क लावणे बंधनकारक आहे. यात वाहनांमधून प्रवास करतानाही मास्क वापरणे बंधनकारक आहे. आता करोनाचा धोका कमी झाल्याने मुंबई महापालिकेने नियमावलीत शिथिलता देवून खासगी वाहनातून प्रवास करताना मास्क वापरणे सक्तीचे नाही, असे सूचवून दंड आकारू नये असे निर्देश दिले आहेत.
याच धर्तीवर आपणही नियमावलीत शिथिलता द्यावी आणि खासगी वाहनातून विनामास्क प्रवास करणाऱ्यांकडून दंड आकारू नये. मात्र, सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वजनिक वाहनांमध्ये मास्क वापरणे बंधनकारक ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली.
दोन्ही महापालिकांनी निर्णय घ्यावा
याप्रकरणी माजी महापौर अंकुश काकडे यांनीही पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे याबाबत मागणी केली आहे. मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला असून पुण्यात मात्र गाडीत मास्क बंधनकारक असून पोलीस मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहेत. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी काकडे यांनी केली.