शेवगाव – राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाची झळ राज्यमार्ग परिवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणात बसली. शेवगाव आगारासह येथून जाणाऱ्या अन्य आगाराच्या मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस शनिवारी रात्रीपासून बंद झाल्या आहेत. आज सोमवारी नेवासा मार्गावरील देखील बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करण्याची वेळ आली. सध्या विविध वर्गाच्या परीक्षा सुरू असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.
परिस्थितीचे गांभिर्य ओळखून शेवगाव आगारातून पैठण, गेवराई, संभाजीनगर आदी ठिकाणी दररोज नियमित सुटणाऱ्या 12 च्यावर एसटी च्या फेऱ्या तसेच राज्याच्या अन्य आगारातून शेवगाव मार्गे मराठवाड्यात संभाजी नगर, बीड, माजलगाव, अंबड, परभणी, नांदेड, जालना, पाथरी आदी ठिकाणी नियमित धावणाऱ्या सर्व बसेस देखील बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठीच अडचण झाली आहे.
सध्या शेवगाव बसस्थानकातून फक्त नगर व पाथर्डी रस्त्यावरील वाहतूक सुरू असून, बालमटाकळीपर्यंत बससेवा प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार सुरू असल्याची माहिती आगार व्यवस्थापक अनमोल फंड, वाहतूक निरीक्षक ऋषिकेश सोनवणे यांनी दिली.
तालुक्याच्या ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी बससेवा विस्कळीत झाल्याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसला असून सध्या परीक्षा सुरू असल्याने त्यांना नाईलाजाने अव्वाच्या सव्वा पैसे मोजून खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था बंद असल्याची माहिती प्रवाशांना नसल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे.दरम्यान, तालुक्यातील मुंगी ग्रामस्थांनी, आमच्या रस्त्यावर बस सोडू नका, अशी विनंती वजा मागणी शेवगाव आगार प्रमुखांकडे केली असता त्या मार्गावरील बससेवा ही बंद करण्यात आली आहे.