मुंबई – अभिनेत्री रिंकू राजगुरु ‘सैराट’ (Rinku Rajguru) या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असल्याचे दिसते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. मात्र इन्स्टाग्रामवर (Instagram) विशेष सक्रिय असणाऱ्या रिंकूच्या इन्स्टाग्रामवरील सर्वच पोस्ट गायब झाल्या आहेत. मात्र अचानक तिच्या पोस्ट कशा काय गायब झाल्या? याबाबत तिने इनस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
तिच्या इनस्टाग्रामवर केवळ दोन पोस्ट दिसत आहेत. 26 जून रोजी शेअर केलेला तिचा एक व्हिडीओ आणि रक्षाबंधननिमित्ताने तिने भावासोबत शेअर केलेला फोटो या दोनच पोस्ट तिच्या इनस्टाग्रामवर दिसत आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत लिहिले की, ‘सर्वांना नमस्कार, माझ्या इन्स्टाग्रामवर काहीतरी समस्या निर्माण झाली होती, पण आता सर्वकाही ठीक आहे आणि मी लवकरच पोस्ट टाकण्यास सुरुवात करेन. तुमचे प्रेम आणि काळजीसाठी धन्यवाद’. इन्स्टाग्रामवरुन पोस्ट गायब होण्यामागचे नेमके कारण तिने यात सांगितले नाही. मात्र या पोस्ट तिने डिलीट केल्या नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
दरम्यान, लवकरच अभिनेत्री रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने (Makarand mane) यांच्या ‘खिल्लार’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये रिंकूसह अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 2024 मध्ये रिलीज होणार आहे.