मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे भाजपसोबत जाण्याचे संकेत
मुंबई – मनसेला सर्व पर्याय खुले असून भविष्यात भाजपासोबतही जाऊ शकते, असे वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. मनसेचे पहिले महाधिवेशन मुंबईत होणार आहे. मनसेच्या झेंड्यात बदल करण्यात आला आहे. तसाच तो धोरणांमध्येही होईल, अशीही चर्चा आहे. अशा सगळ्या वातावरणात बाळा नांदगावकर यांनी केलेले वक्तव्य सूचक आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, यापूर्वी आम्ही शिवसेनेला मदत केली. तसेच भाजपलाही मदत केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीलाही मदत केली. आम्हाला कोणी मदत केली ते सगळ्यांना माहित आहेच. त्यामुळे भविष्यात कुणासोबत जायचे हा निर्णय राज ठाकरे घेतील. राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो. त्यामुळे लोकांच्या मनात आहे ते घडनाता दिसत आहे, असे म्हणत भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
दरम्यान ज्या पक्षाचा भूतकाळ आणि वर्तमान पाहिला तर सध्या त्या पक्षाची चर्चाही नाही. मात्र भविष्यात काहीही होऊ शकते. समविचारी पक्षांनी एकत्र येण्यात काहीही अडचण नाही. भाजप आणि मनसे यांची विचारधारा वेगळी आहे. कार्यकर्त्यांमध्ये विसंगती आहे. असे असले तरीही भविष्यात मनसेची ध्येय धोरणे बदलली तर काहीही होऊ शकते, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार राम कदम यांनी दिली.