अमरावती – जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे एकतर्फी प्रेमातून बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या 17 वर्षीय तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणाने गार्डनमध्येच तरुणीच्या पोटात चाकू भोसकून तिचा निघृण खून केला. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या पोटातही चाकू भोसकून घेतला. या हल्लात पीडित तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी तरुणाने स्वतःच्या पोटातही चाकू भोसकून घेतल्याने तोही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून याची पाहणी केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
एकतर्फी प्रेमातून झालेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. विशेषतः ज्या पालकांच्या मुली शाळा-महाविद्यालयात जात आहेत, त्यांच्याकडून आपल्या पाल्यांविषयी काळजी व्यक्त केली जात आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या खूनानंतर पोलिसांचा धाक नसल्याचेही बोलले जात आहे. तसेच मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष काळजी घ्यावी आणि सुरक्षा अधिक चोख करावी, अशी मागणी पालक करत आहेत.