करोनाच्या पार्श्वभूमीवर भुसार बाजार वगळता सर्व मार्केट यार्ड शुक्रवारपासून बंद

पुणे   – करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा आणि केळी विभाग शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी परिपत्रक काढून दिली आहे.

शहरात करोनाचा संसर्ग वाढत आहे. शहरातील पूर्व भाग पोलिसांनी सील केला आहे. मार्केट यार्ड ही याच भागात आहे. हा भाग सील केला असला तरी, मार्केट यार्ड सुरू ठेवण्याची भूमिका सुरुवातीला बाजार समिती प्रशासनाने घेतली होती. मात्र, वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सील केलेल्या भागातील आडते, कामगार, तोलणार आणि विविध बाजार घटकांनी बाजारात कामाला येऊ नये, अशी भूमिका बाजार समितीने घेतली होती. यानंतर कामगारांनी कामात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.

याबाबतची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे सचिव संतोष नागरे यांनी केली होती. तर, ,श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड का आडते असोसिएशननेही बाजार बंद ठेवण्याची विनंती प्रशासनाकडे केली होती. यानंतर आज परिपत्रक काढून पुढील आदेश येईपर्यंत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.