सातारा -क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल झालेली जिल्ह्यातील पहिली 45 वर्षीय महिला उपचारानंतर ठणठणीत बरी झाली. जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने बुधवारी दुपारी साडेबारा वाजता या महिलेला टाळ्या वाजवून व गुलाबपुष्प प्रदान करून निरोप देण्यात आला. रूग्णालय प्रशासनाच्या सेवेचा हा चांगला परिणाम मानला जात आहे. सातारा जिल्हयासाठी दिवसभराच्या घडामोडीत ही अत्यंत दिलासा देणारी बातमी देणारी ठरली .
कोविड-19 बाधित महिलेचा 14 दिवसानंतरच्या दुसऱ्या नमुन्याचा रिपोर्ट काल रात्री उशिरा निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. ही महिला कोविड-19 या आजारातून पूर्णपणे बरी झाल्याचे रात्री जाहीर करण्यात आले. बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजता या महिलेच्या डिस्चार्जची प्रक्रिया सुरू झाली. ईएनटी स्पेशालिस्ट डॉ. सायली सुपेकर व डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी या महिलेला उपचार दिले.
चौदा दिवसानंतर पाठवण्यात आलेला स्त्रावाचा अहवाल निगेटिव्ह आला. पुन्हा एकदा महिलेची तपासणी करुन तिला डिस्चार्ज करण्याचा निर्णय झाला. रूग्णालय प्रशासनाचे सर्व कर्मचारी, डॉक्टर्स, जिल्हा चिकित्सक डॉ. आमोद गडीकर विलगीकरण कक्षाच्या बाहेर दुतर्फा उभे होते. या महिलेला गुलाबपुष्प देऊन व टाळ्या वाजवून रूग्णालयाच्या वतीने डिस्चार्ज देण्यात आला.