सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत वेळ
पुणे – “करोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेमार्फत प्रतिबंधात्मक वैद्यकीय उपाययोजना करण्यात येत असून, त्या अनुषंगाने नागरिकांना वैद्यकीय सुविधा सुलभपणे प्राप्त होण्यासाठी महापालिका क्षेत्रातील ठरावीक दवाखाने सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
पालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांकडे वैद्यकीय पथकामार्फत “करोना’ बाधित भागांमध्ये वैद्यकीय तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी या वैद्यकीय पथकांना रुग्णवाहिका, औषधे, साधनसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
“करोना’ विषयक नागरिकांचे प्रश्न, औषधोपचार अथवा शंका निरसन करण्यासाठी पुणे महापालिका आणि पुणे सिटी कनेक्ट यांच्यावतीने आणि कनेक्टिंग संस्थेच्या सहकार्याने “करोना विरुद्ध वस्तीमित्र हेल्पलाइन’ सुरू करण्यात आली आहे. “करोना’ बाबत माहिती हवी असल्यास नागरिकांनी 020- 25506923/ 24/25 या दूरध्वनी क्रमांकावर या संपर्क साधण्याचे आवाहन पुणे आरोग्य विभाग यांनी केले आहे.