समस्त उद्योगजगत आशावादी; खासगी गुंतवणूक वाढून उत्पादकतेला चालना मिळावी

मुंबई – रालोआ सरकारला पूर्ण बहुमत मिळाल्याबद्दल उद्योग क्षेत्रातील ज्येष्ठ उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आहे. या बहुमताचा फायदा घेऊन सरकारने आर्थिक आणि इतर क्षेत्रात कामगिरी करून भारताला शक्‍य तितक्‍या लवकर विकसित देशांच्या पंक्तीत नेऊन बसवावे असे मत या उद्योजकांनी व्यक्त केले.

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सांगितले की, या निवडणुकांत महिला आणि तरुणांनी सहभाग वाढविला आहे. त्याचा आदर करून सरकारने त्यांच्यासाठी उपयोगी कामे करण्याची गरज आहे. वेदांत रिसोर्सचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी म्हटले आहे की, स्थिर सरकार देऊन जनतेने चांगला निर्णय घेतला आहे. उद्योग व्यवसायासाठी सुलभ वातावरण तयार करण्यासाठी सरकारने अधिक ताकतीने पुढाकार घ्यावा.

ज्येष्ठ बॅंकर उदय कोटक यांनी सांगितले की, भारताची जागतिक महासत्ता होण्याची इच्छा या सरकारने पूर्ण करावी. उद्योगजगत याकामी सरकारला आवश्‍यक ते सहकार्य करणार आहे. निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगडिया म्हणाले की, आता सरकारने आवश्‍यक त्या सुधारणा अधिक ताकदीने पुढे पुढे नेण्याची गरज आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राकडे या सरकारने लक्ष दिल्यास कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होणार आहे.

हाऊस ऑफ हिरानंदानी या कंपनीचे संचालक सुरेंद्र हिरानंदानी यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षात रिऍल्टी क्षेत्राला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला आहे. या क्षेत्रात गुंतवणूक वाढेल व प्रकल्प वेगाने पूर्णत्वास जातील यासाठी आवश्‍यक उपाययोजना सरकारने करणे अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)