पुणे – एम टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय टॅलेंट सिरीज 12 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात तमन्ना नायर, वीरा हरपुडे, श्रावि देवरे, शिबानी गुप्ते यांनी तर, मुलांच्या गटात तनिष्क देवरे, सुजय देशमुख या खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलींच्या गटात बिगरमानांकीत वीरा हरपुडे हिने चौथ्या मानांकित कीर्तीयानी घाटकरचा 6-3, 6-1 असा पराभव केला. पुण्याच्या श्रावि देवरेने आपली शहर सहकारी पाचव्या मानांकित अनुष्का जोगळेकरला 6-1, 6-0 असे पराभूत केले. शिबानी गुप्ते हिने सहाव्या मानांकित ऐश्वर्या स्वामीनाथनचे आव्हान 7-5, 6-1 असे मोडीत काढले. तिसऱ्या मानांकित तमन्ना नायरने सान्वी राजूचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
मुलांच्या गटात तनिष्क देवरे याने दुसऱ्या मानांकित वीरेन चौधरीचा 6-1, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. पुण्याच्या बिगरमानांकीत सुजय देशमुख याने सातव्या मानांकित विश्वास चंद्रसेकरनला 6-2, 6-2 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकित ऋषिकेश मानेने सय्यम पाटीलला 6-0, 6-3 असे नमविले. अव्वल मानांकित आरव पटेलने अनिश वडनेरकरचा 6-3, 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.