मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी दिलेला सल्ला खूपच मोलाचा व लाभदायक ठरला, असे मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज मुरुगन अश्विन याने म्हटले आहे.
आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात मला मुंबई इंडियन्सकडून खेळायला मिळाले त्याचा आनंद होत आहे. स्पर्धेतील माझा पहिला सामना खेळण्यापूर्वी मला सचिन सरांकडून डेब्यु कॅप मिळाली. मी ब्रेबॉन मैदानावर पहिल्यांदाच खेळत होतो. त्यावेळी सचिन यांनी मला अनेक मोलाचे सल्ले दिले तसेच या मैदानाच्या खेळपट्टीबाबतही टीप्स दिल्या.
प्रत्यक्ष सामना खेळताना मला त्याचा खूप लाभ झाला. गोलंदाजी करताना फिरकी गोलंदाजाने क्रीझचा कसा पुरेपुर वापर करायचा असतो ते देखील सचिन यांच्याशी बोलताना समजले, असेही त्याने सांगितले.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पदार्पण करताना मला सचिन यांच्याकडून डेब्यू कॅप मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. यावेळी मला सचिनसोबत बोलण्याची संधी मिळाली. ज्या खेळाडूला पाहून लहानपणापासून मला क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पडत होते ते पूर्ण झाल्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण आहे, असेही त्याने म्हटले आहे.