बिजींग – चीनमधील अलिबाबा उद्योग समुहाचे संस्थापक जॅक मा हे गेल्या दोन महिन्यापासून गायब झाले आहेत. त्यांचा ठावठिकाणा अद्याप कोणालाच कळलेला नाही. त्यामुळे त्यांच्या विषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
अलिबाबा उद्योग समुहाच्या संपत्तीची उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांन चीनमधील प्रत्येक क्षेत्रात अधिक प्रभाव निर्माण केल्याने त्यांच्या विरोधात काहीं तरी घातपात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या कंपनीतर्फे 37 अब्ज डॉलर्सचा जगातला सर्वात मोठा आयपीओ घोषित केला होता. पण त्यांच्या या कंपनीचा आयपीओ चीन सरकारने त्वरेने थांबवला होता.
हा आयपीओ हॉंगकॉंग आणि शांघाय या दोन शेअरबाजारावर 5 नोव्हेंबर रोजी नोंदवला जाणार होता. या निर्णयाबद्दल जॅक मा यांनी जाहीरपणे चीन सरकारच्या विरोधात मतप्रदर्शन केले होते. चीनचे नियंत्रक काळाच्या खूप मागे आहेत अशी टीका त्यांनी केली होती.
अलिबाबा ही जगातील एक प्रमुख ई कॉमर्स कंपनी असून त्या कंपनीचा जगभर मोठा व्यवसाय आहे. अलिबाबा या कंपनीने भारतातील पेटीएम, पेटीएम मॉल, झोमॅटो, बिग बास्केट, स्नॅप डील अशा कंपन्यांमार्फत गुंतवणूक केली आहे.