पुणे – स्वच्छ इंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत फायदेशीर असलेल्या सीएनजी गॅसचे दर वाढले आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून सीएनजी गॅसमध्ये प्रती किलो 1 रुपये 55 पैशांची वाढ करण्यात आली.
नव्या दरानूसार 55 रुपये 50 पैसे प्रति किलो दराने सीएनजी खरेदी करावा लागणार आहे. दरम्यान, घरगुती वापरासाठीच्या पीएनजी (पाइप नॅचरल गॅस) गॅसच्या किंमतीमध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नसल्याचे एमएनजीएलकडून सांगण्यात आले.
देशात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनदरवाढ होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने आजवरचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. यातच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून रविवारपासून शहरातील सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या दरातवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आजवर शहर हद्दीत सीएनजी गॅस 53 रुपये 95 पैसे प्रति किलो उपलब्ध करून देण्यात येत होता. यात किलोमागे 1 रुपया 55 पैशांची वाढ करण्यात आहे. सद्यस्थितीत शहरात सीएनजीवर चालणारी एकूण एक लाख 80 हजारांपेक्षा अधिक वाहने आहेत. यात चारचाकी कारची संख्या सर्वाधिक आहे.