इस्लामाबाद – पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या अद्यक्षपदाच्या निवडणुकीतून बॅरिस्टर अली जाफर यांनी माघार घेतली आहे. दोनच दिवसांपूर्वी पक्षाचे तत्कालिन अध्यक्ष बॅरिस्टर गौहर अली खान यांनी पक्षांतर्गत निवडणुकीमध्ये जाफर यांचे नाव पीटीआय पक्षाचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर्गत निवडणूक रद्द ठरवल्यामुळे बॅ. गौहर अली खान यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे.
बॅरिस्टर जाफर हे सिनेटमधील पक्षाचे सदस्य आहेत. त्याशिवाय वकील असल्याने ते पक्षाशी संबंधित विविध खटल्यांमध्ये पक्षाची बाजू कोर्टात मांडत आहेत. म्हणून पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव समर्पक असल्याची प्रतिक्रीया सर्व स्तरांमधून उमटली होती.
मात्र एकाचवेळी या दोन्ही जबाबदार्या सांभाळणे शक्य नाही. पक्षाचे नेतृत्व करण्यापेक्षा पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांना तुरुंगातून सोडवण्याच्या कामाला आपण प्राधान्य देऊ इच्छित असल्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे बॅरिस्टर जाफर यांनी जाहीर केले.
पीटीआय पक्षाच्या पक्षांतर्गत निवडणुका ३ मार्चला घेण्यात येणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार इच्छुक उमेदवारांचे अर्ज २३-२३ फेब्रुवारीला दाखल होणार होते. तर आज (२५ फेब्रुवारी) अर्जांची चाननी होणार होती. पात्र उमेदवारांच्या नावांची घोषणा २७ फेब्रुवारीला होणार आहे.