नवी दिल्ली – बंदी घातलेल्या स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) संघटनेचा सदस्य हनीफ शेख याला तब्बल २२ वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. २००१ मध्ये दिल्लीच्या एनएफसी पोलिस ठाण्यात त्याच्यावर युएपीए आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. सिमीच्या ‘इस्लामिक मूव्हमेंट’ (उर्दू आवृत्ती) मासिकाचा तो संपादक होता आणि गेल्या २५ वर्षात त्याने अनेक मुस्लिम तरुणांना शिकवून फूस लावली आहे. ‘इस्लामिक मुव्हमेंट’ (उर्दू आवृत्ती) मासिकावर प्रकाशित झालेले ‘हनिफ हुदई’ हे नाव पोलिसांना एकमेव क्लू उपलब्ध होते, त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नव्हती. गेल्या चार वर्षांपासून पोलिसांचे पथक त्याचा पाठलाग करत होते.
हनीफला 2002 मध्ये फरार घोषित करण्यात आले होते
आरोपी हनिफ शेख हा वहादत-ए-इस्लामच्या थिंक टँक सदस्यांपैकी एक असून तो महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यात महत्त्वाची भूमिका बजावत होता. तो सिमी तसेच वहदत-ए-इस्लामच्या अजेंड्याला पाठिंबा देण्यासाठी आणि निधी देण्यासाठी देणग्यांच्या नावाखाली पैसे गोळा करण्यात गुंतलेला आहे. हनिफवर वेगवेगळ्या राज्यात चार गुन्हे दाखल आहेत. आरोपी हा महाराष्ट्रातील भुसावळ येथील रहिवासी आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली, कर्नाटक आणि केरळमध्ये सिमी संघटनेच्या बैठकांमध्ये सहभागी होण्यात आणि आयोजित करण्यात हनिफचा सक्रिय सहभाग होता.
पोलिसांनी सापळा रचून अटक केली
आरोपी हनिफ हुदाई याने मोहम्मद हनिफ अशी आपली ओळख बदलली असून तो महाराष्ट्रातील भुसावळ येथील उर्दू शाळेत शिक्षक असल्याची विशिष्ट माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी सापळा रचून पोलिसांनी त्याला भुसावळ येथून पकडले. हनिफ शेख यांनी १९९७ मध्ये मारुल जळगाव येथून डिप्लोमा केला. तो त्याच वर्षी सिमी संघटनेत सामील झाला आणि ‘अन्सार’ (पूर्णवेळ कार्यकर्ता) बनला. सिमी कार्यकर्त्यांच्या संपर्कात आल्यानंतर तो अत्यंत कट्टरपंथी झाला. नंतर हनीफ शेखने सिमीच्या साप्ताहिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आणि मुस्लिम तरुणांना संघटनेत सामील होण्यासाठी कट्टरपंथी बनवण्यास सुरुवात केली.
हनिफने मुस्लिमांवरील अत्याचारावरचिथावणीखोर लेख लिहिले होते. त्याने प्रभावित होऊन सिमीचे तत्कालीन अध्यक्ष साहिद बदर यांनी हनीफ शेख यांना २००१ साली ‘इस्लामिक मूव्हमेंट’ या सिमी मासिकाच्या उर्दू आवृत्तीचे संपादक बनवले. त्यांनी मासिकात मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचारांवर प्रकाश टाकणारे अनेक दाहक लेख लिहिले होते. यानंतर त्याला सिमी मुख्यालय, झाकीर नगर, दिल्ली येथे एक खोली देण्यात आली. हनीफ शेखचे सफदर हुसेन नागोरी, अब्दुस शुभान कुरेशी उर्फ तौकीर, नोमान बदर, शहनाज हुसेन, सैफ नचैन, मोहम्मद यांच्याशी जवळचे संबंध होते. खालिद, दानिश रियाझ, अब्दुल्ला दानिश आणि इतरही सिमीचे सदस्य होते.
२००१ पासून पोलीस शोध घेत होते
२००१ मध्ये पोलिसांच्या छाप्यादरम्यान हनिफ शेख हा इतर लोकांसह घटनास्थळावरून पळून गेला आणि भूमिगत झाला होता. यानंतर हनिफ जळगाव व नंतर भुसावळला गेला. अटक टाळण्यासाठी तो सतत आपली ठिकाणे बदलत राहिला. ते भुसावळ येथील महापालिकेच्या शाळेत उर्दू शिक्षक म्हणून शिकवत होता.
‘वहादत-ए-इस्लाम’ मधून नवी संघटना सुरू केली.
सिमी संघटनेवर बंदी घातल्यानंतर बहुतांश सक्रिय सदस्य विखुरले गेले. त्यांच्यापैकी काहींनी स्वतंत्रपणे त्यांच्या दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या आहेत आणि अनेक स्फोट आणि इतर देशविरोधी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग आहे. कालांतराने ‘वहदत-ए-इस्लाम’च्या ज्येष्ठ सदस्यांनी नव्या संघटना सुरू केल्या. या संघटनेचे बहुतांश सदस्य सिमीचे आहेत.