मुंबई : कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने राज्य सरकार कडून घरपोच मद्य विक्रीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हा निर्णय राज्य सरकार कडून मागे घेण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला याबाबत राज्य सरकार कडून आदेश देण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
कोरोना काळात मद्यविक्रीच्या व्यवसायाला मोठा फटका बसला होता त्यामुळे मे २०२० पासून घरपोच मद्य विक्रीचा निर्णय घेण्यात आला होता . परवानाधारक मद्यविक्रेत्यांना घरपोच मद्य विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. शिवाय उत्पादन शुक्ल विभागाच्या वेबसाइटवरून मद्य विक्रेत्यांना परवाना मिळवण्याची मुभा देण्यात आली होती. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून घरपोच मद्यविक्रीचे आदेश देण्यात आले होते.
त्यानंतर पुढील वर्षी २०२१ मध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने घरपोच मद्यविक्री होतच होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सर्व सेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत झाल्या आहेत. त्यामुळे आता घरपोच मद्यविक्रीचा निर्णय राज्य सरकारकडून मागे घेण्यात आल्याचे समजते आहे. त्यामुळे आता ग्राहकांना घरपोच मद्य मिळणार नाही. या निर्णयाची अंमलबजावणी केव्हापासून होणार आहे ? याची मात्र अद्याप माहिती मिळालेली नाही.