तिरुवनंतपुरम : केरळमध्ये काही भागात कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड सुरु झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री पी.विजयन यांनी दिली आहे. विजयन यांनी म्हटले आहे की, तिरुवनंतपुरमच्या काही किनारी भागात कोरोना संक्रमण वेगाने होत आहे. या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. या भागात कोरोनाचा कम्यूनिटी संसर्ग सुरु झाला आहे. आजपासून या भागात पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असेही विजयन यांनी सांगितले. या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यास सरकार सर्व आवश्यक उपाययोजना करत आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, कम्युनिटी स्प्रेड पूनतुरा आणि पुल्लुविला मध्ये सर्वाधिक झाला आहे.
मुख्यमंत्री विजयन यांनी, आता आपण कोरोनाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. तिरुवनंतपुरमच्या पूनतुरा आणि पुल्लुविलासह ज्या भागात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत, तिथे कडक नियम लावले जात आहेत. ते म्हणाले की, जिल्ह्यात 246 नवीन कोरोना केसेस समोर आल्यात, त्यातील 237 लोकं कुणाच्या तरी संपर्कात आल्यानं संक्रमित झाले आहेत. सर्वाधिक संक्रमण झालेल्या भागाला तीन झोनमध्ये रुपांतरीत केलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी शनिवारी किनारपट्टी भागात ट्रिपल लॉकडाउन लागू करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. या पट्ट्यात आजार अतिशय वेगाने पसरत आहे, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.
केरळने आता कोरोनाच्या चाचण्या वाढवल्या आहेत. चाचण्याच्या बाबतीत देशातील सर्वात कमी दरांपैकी हा दर आहे. केरळने आतापर्यंत चार लाखांपेक्षा कमी चाचण्या केल्या आहेत, तर शेजारच्या तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये तिप्पट संख्या नोंदली गेली आहे. केरळमध्ये आतापर्यंत 11066 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 4995 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.