आळंदी – येत्या शुक्रवारी (2 जुलै) माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा करोनाच्या महामारी मुळे अत्यंत अल्प संख्येमध्ये साजरा होत आहे. प्रथा परंपरेचे पालन करीत हा सोहळा साजरा करण्यात येत आहे.
त्यासाठी आळंदी पोलीस प्रशासन, आळंदी देवस्थान, आरोग्य विभाग, आळंदी नगरपरिषद व महसूल विभाग यांच्यामार्फत पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. संचारबंदी असल्याने माऊली मंदिराकडे व इंद्रायणी घाटाकडे जाणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. 4 जुलैपर्यंत आळंदी माऊली मंदिरात, इंद्रायणी घाटावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.
गतवर्षी माऊलींच्या पादुका करोनाच्या महामारीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीतुन पंढरीकडे मार्गस्थ केल्या होत्या. यावर्षी देखील एका ऐवजी दोन बसेसमधून सुमारे 100 मानकरी यांना शासनाने मान्यता दिली आहे. 2 जुलै रोजी माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा होत आहे. तद्नंतर माऊलींच्या चलपादुका 18 जुलैपर्यंत आळंदीच्या माऊली मंदिरात नजिक असणाऱ्या माऊलींच्या आजोळ घरी मुक्कामी राहतील, असे पालखी सोहळा प्रमुख विश्वास ढगे पाटील यांनी सांगितले.
यंदा माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मोजकेच वारकरी, मानकरी, दिंडेकरी व आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. आळंदी नगरपरिषद व महसूल विभाग यांना सुविधांची अल्प सोय (व्यवस्था) असल्याने या दोन्ही विभागांचा ताण कमी झाला आहे; मात्र आरोग्य विभागावर करोनामुळे अधिकचा ताण पडणार आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही येथील स्वकाम सेवा मंडळ, विश्व सामाजिक संस्था तसेच इतर सामाजिक संस्थेच्या वतीने माऊली मंदिर, इंद्रायणी घाट, महाद्वार चौक आदी ठिकाणी स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. अलंकापुरी महाद्वार रस्ता (ता. खेड) :इंद्रायणी घाटाकडे जाणारा प्रदक्षिणा मार्गाचा मुख्य रस्ता सील करण्यात आला आहे.