नैरोबी : केनियातील किनाऱ्याजवळच्या लामू भागातील लष्करी तळावर सोमालियातील अल शबाब या दहशतवादी संघटनेने हल्ला केला असल्याची माहिती सैन्याच्या प्रवक्त्याने दिली.
हा हल्ला मंडा बे येथील कॅम्प सिंबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळावर करण्यात आला. पहाटे 5.30 वाजता झालेल्या या हल्ल्यादरम्यान मंडा हवाई तळाची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी हा हल्ला यशस्वीपणे परतवून लावला. या धुमश्चक्रीमध्ये 4 दहशतवादी मारले गेले.
हवाई धावपट्टी सुरक्षित असून चकमकीदरम्यान तळावरील काही इंधनाच्या टाक्यांना आग लागली, असे सैन्याचे प्रवक्ते कर्नल पॉल न्जुगांगा यांनी सांगितले. घटनास्थळी आणखी दहशतवादी लपून बसले आहेत का, याचा शोध घेतला जात असल्याचे लामू प्रांताचे कमिशनर इरुन्गू माचारिया यांनी सांगितले.
या हल्ल्याची जबाबदारी अल शबाबने स्वीकारली आहे. या तळावर ताबा मिळवल्याचे या संघटनेने म्हटले आहे.
केनियाने सोमालियामध्ये 2011 मध्ये आपले सैन्य पाठवले होते. त्यानंतर केनियात वाढलेल्या या गटाने हा हल्ला केला आहे.