कोलकाता : पश्चिम बंगालमधील वर्धमान रेल्वे स्थानकाच्या इमारतीचा काही भाग काल (शनिवारी)रात्री अचानक कोसळला. या अपघातात जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मरण पावलेल्या 30 वर्षीय युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही, असे पूर्व रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले.
कॉंक्रिटच्या बांधकामाचा काही भाग या युवकाच्या डोक्यावर पडला होता. वर्धमान मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपाअर सुरू होते. अन्य एकजण या दुर्घटनेदरम्यान जखमी झाला असून त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पश्चिम बंगालचे मंत्री स्वपन देबनाथ यांनी सांगितले.
राजधानी कोलकात्यापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या या रेल्वे स्टेशनची इमारत सुमारे शंभर वर्षे जुनी असल्याने तिच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. रेल्वे स्टेशनाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या चौकशीच्या दालनापाशी असलेला काही भाग अचानक कोसळला.
हा भाग प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळचा असल्याने तेथे प्रवाशांची खूप गर्दी होती. या ठिकाणचा आणखी काही भाग रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास कोसळला. मात्र त्यावेळी प्रवाशांना दूर हटवले होते. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही.
या दुर्घटनेमुळे रेल्वेच्या वाहतुकीवर काहीही परिणाम झाला नाही, असे पूर्व रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. या घटनेची चौकशी करण्यासाठी पूर्व रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.